मुंबई -बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवास्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेऊन नंतर मुख्यमंत्री यांनी, या प्रकरणी त्याला न्याय देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप न्याय न मिळाल्याने पुन्हा एकदा हा शेतकरी आपल्या चार मुलींसह मातोश्रीबाहेर आंदोलन करणार आहे.
पनवेलमधील शेतकरी महेंद्र देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जानेवारी महिन्यात मातोश्रीवर आले होते. मात्र, बराच वेळ होऊनही भेट होत नसल्याने त्यांनी मातोश्रीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. याला शेतकऱ्याने विरोध केला. अखेर पोलिसांनी मुलीसह शेतकऱ्याला ताब्यात घेतले. संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी खैरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
काय होते प्रकरण..
स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या कर्जा पेक्षा अधिक कर्ज माझ्या नावे दाखवले आहे. हे कर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी माझ्या खात्यावर चढवले, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. बँकेच्या कर्जासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे, निराश झालेले देशमुख यांनी थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री कार्यालयातून मग त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रश्न सोडवण्याचे दिले होते आश्वासन...
मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांनी देशमुख यांची समस्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, याप्रकरणी कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा आपल्या चार मुलींसह उद्या मातोश्रीवर आंदोलन करणार, असे शेतकरी देशमुख यांनी सांगितले. तसेच, बँकेने माझ्यावर लाखोंचे कर्ज दाखवले. ही सर्व कर्जे खोटी आहेत. याबाबत पुरावे देऊन देखील रायगड पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. त्यामुळे, मी राज्यपालांना पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला. गेल्यावेळी मातोश्रीवर मुलीला घेऊन गेलो. त्यावेळेस मुख्यमंत्री यांनी व कृषी मंत्री दादाभुसे यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालून चौकशीचे आदेश देऊ, असे सांगितले होते. मात्र, बँकेला सूचना केली गेली नाही. त्यामुळे, बँक अजूनही मला त्रास देत आहे. त्यामुळेच मी उद्या पुन्हा मातोश्रीवर आपले प्रश्न घेऊन जाणार आहे, असे ईटीव्ही भारतशी बोलताना महेंद्र देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा-मुंबई महानगरपालिकच्या नगरसेवकांचे प्रगती पुस्तक प्रकाशित; काँग्रेस 'नंबर वन'