मुंबई -महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) भारतातच असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या किल्ला न्यायालयात झालेल्या सुनावणीत गोरेगाव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी न्यायालयाने सिंह यांना फरार घोषित केले होते. न्यायालयाची हीच नोटीस आता त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे.
याच इमारतीत परमबीर सिंह यांचे घर परमबीर सिंह यांच्या जीवाला धोका असल्याने ते समोर येत नाहीत, अशी माहिती सिंह यांच्या वकिलाने सोमवारी (दि. 23) न्यायालयात दिली होती. पुढील 48 तासांत कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात न्यायालयात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता.
परमबीर सिंह, रिजाय भाटी व विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंह हे न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
नेमकं प्रकरण काय..?
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तर दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सिंह यांचा शोध घेत आहे. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायलयात सांगितले होते. त्यामुळे सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, त्याआधीच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आले. तसेच या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर यांना अटकेपासून संरक्षण
फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 22) अटकेपासून संरक्षण दिले. तसेच त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभागास (CBI) दिले आहे. परमबीर सिंह देशातच असून ते कोठेही पळूनही जणार नाहीत. पण, त्यांच्या जिवाला सध्या धोका असल्याने ते पुढे येत नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
हे ही वाचा -st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव