मुंबई- कुख्यात गुंड एजाज लकडावाला याच्यावर वाकोला पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील एका व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लकडावाला यांनी जून 2013 ते मार्च 2017 या दरम्यान व्यावसायिकाला अनेकदा धमक्या दिल्याचा आरोप आहे. मात्र जीवाच्या भीतीने पोलिसात धाव घेतली नाही. लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार नोंदवत आहे. लकडावाला यांना जानेवारी 2020 मध्ये पाटणा जंक्शनजवळील मिठापूर ओव्हरब्रिजवरून अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे पाठवण्यात आले आहे. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी व्यायसायिकाला दिली होती. या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडावाला याच्याविरोधात मुंबईत 25 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हा अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग होऊ शकतो.
लकडावाला यांच्यावर 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत -
एजाज लकडावाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा आहे. त्याच्यावर 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एजाज 2004 मध्ये रुग्णालयातून पळून गेला होता. 2008 पासून पोलिसांना लकडावालाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. छोटा राजन टोळीचा सदस्य एजाज हा मुंबई आणि दिल्लीतील 24 हून अधिक प्रकरणांमध्ये हवा आहे. ज्यात खून आणि खंडणीच्या अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.