मुंबई : आतापर्यंत तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील वाळुची शिल्प काढणारे, दगड कोरून चित्र काढणारे असे अनेक कलाकार आपण पाहत असतो. मुंबईमध्ये राहणारा निलेश चव्हाण हा कलाकार पक्ष्यांच्या पंखावरती सुंदर कलाकृती साकारतो. या त्याच्या कार्याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.त्याचबरोबर OMG ये है मेरा इंडिया या कार्यक्रमातही तो दिसला होता. आतापर्यंत त्याने पंखांवर विविध चित्र साकारली आहेत. यासाठी तो देशी तसेच परदेशी पक्षांचे पंख त्यांने गोळा केले आहेत.
मुंबईतील निलेश चव्हाण हा कलाकार पक्ष्यांच्या पंखांवरती सुंदर कलाकृती साकारतो पंख मिळवण्यासाठी दोन वर्ष मेहनत
"मागील पाच ते सहा वर्षापासून मी ही कला जोपासतो आहे. त्यासाठी मला परदेशी पक्षांची पंख उपयोगी पडतात. मात्र, ही पंख मिळवणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. हे पंख मिळवण्यासाठीच मला तब्बल दोन वर्षे लागली. या दोन वर्षात मी विविध परदेशी पक्ष्यांची पंख गोळा केली व सध्या याच पंखांवर मी माझी कला जोपासतो आहे."
अशी झाली सुरुवात -
"माझी बहीण अमेरिकेमध्ये असते. ती पुस्तक वाचत होती. त्या पुस्तकांमध्ये तिला पक्ष्यांच्या पंखावरती रेखाटलेले चित्र दिसलं. त्याचा फोटो तिने मला पाठवल्यावर मी काहीतरी करायेच ठरवले. पाच ते सहा वर्षांपूर्वी माझं पहिलं चित्र मी कबुतराच्या पंखावरती रेखाटलं होतं. मी काढलेले चित्र माझ्या काही मित्रांना व नातेवाईकांना पाठवल्यावर त्यांना ते आवडलं. आणि इथूनच मग माझ्या कलेला सुरुवात झाली."
हेही वाचा -Budget Session : अधिवेशनात राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी उपस्थित राहावे; शरद पवारांचे आदेश
'कायद्याचं उल्लंघन करू नका' निलेशचं आवाहन"
मी जी पंख गोळा करतो. ती कोणत्याही पक्षाची हत्या करून गोळा करत नाही. तर, ज्या वेळेस वातावरणात बदल होत असतात त्यावेळी पक्ष्यांचे पंख गळतात. तेच पंख मी गोळा करतो व त्याच्यावरतीच चित्र साकारतो. तुम्ही जर या कलेकडे वळलात तर कोणत्याही पक्षाची हत्या करून कला जोपासू नका. कायद्याचं उल्लंघन करू नका. प्राण्यांची दुकानातही पंख सहज मिळतात त्यांच्याकडून घेऊ शकता. मात्र, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या" असं आवाहन निलेश करतात.