मुंबई- कोरोना लॉकडाऊनमुळे मंदीची झळ सोसणाऱ्या बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 26 ऑगस्टला मुद्रांक शुल्क 2 ते 3 टक्क्यांनी कमी केले आहे. याचा चांगला फायदा बांधकाम व्यावसायाला होताना दिसत आहे. कारण सप्टेंबरमध्ये दस्तनोंदणी वाढली असून घर विक्री व्यवहार वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदवले गेले आहेत. या वर्षातील ही सर्वाधिक दस्तनोंदणी असून यातून राज्याला 937 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑगस्टमध्ये 972 कोटींचा महसूल मिळाला होता तर 2 लाख 6 हजार 857 दस्त नोंदवले गेले होते. पण यावेळी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे ऑगस्टमध्ये 5 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क वसुली झाली होती. तर सप्टेंबरमध्ये 2 ते 3 टक्क्यांनी वसुली झाली आहे. त्यामुळे दस्त वाढले आहेत पण महसूलाची रक्कम मात्र घटली आहे.
22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू झाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग-धंदे, व्यवसाय, क्षेत्र बंद झाले. परिणामी महसूलाचे अनेक स्रोतही बंद झाले. यावेळी मुद्रांक शुल्क-नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. पण खरेदी-विक्री व्यवहाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे एप्रिलमध्ये केवळ 1425 दस्त नोंदवले गेले आणि यातून राज्याला केवळ 3 कोटी 94 लाख इतका महसूल मिळाला होता. आजवरच्या इतिहासातील हा सर्वात कमी महसूल होता. जूनमध्ये मात्र मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाने ऑनलाइन बरोबरच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली. त्यानंतर मात्र महसूल हळूहळू वाढू लागल्याचे चित्र आहे. जूनमध्ये 1 लाख 74 हजार 394 दस्त नोंदवले गेले, तर यातून 819 कोटीचा महसूल राज्याला मिळाला. जुलै मध्ये 88 हजार 049 दस्त नोंदवले गेले तर यातून 933 कोटी तिजोरीत जमा झाले.