मुंबई -आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. धारावीत आज 99 नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 913वर गेली आहे. दादरमध्ये नवे 121 रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 1521वर तर महिममध्ये 134 नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रूग्णांची संख्या 1730वर पोहोचली आहे.
धारावीत 913 अॅक्टिव्ह रुग्ण
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 2 फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात 334 रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात 8 ते 11 हजारावर गेली. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत 8 मार्चला दिवसभरात 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 18 मार्चला ही रुग्णसंख्या 30वर पोहोचली होती. आज धारावीत 99 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण 5474 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4243 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 913 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
माहिममध्ये 1730 सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर, माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहिममध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आज 121 तर आतापर्यंत 7026 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 5339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज 134 रुग्ण तर आतापर्यंत 7142 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 5257 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1730 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत सहावेळा शून्य रुग्ण
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत 1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै, ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. 24 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी, 2 फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.