मुंबई- कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याचे सामोर आले आहे. 25 मे पासून आतापर्यंत या आजाराचे 8920 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल 1014 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक मृत्यू हे पुणे, मुंबई आणि नागपूर येथे नोंदविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
8920 रुग्णांची नोंद -
बुरशी म्हणजेच फंगसचे वर्षाला चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यावर या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 25 मे ला राज्यात कोरोना झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले. आतापर्यंत 8 हजार 920 जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 4 हजार 357 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 395 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सध्या नवे रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.