मुंबई- सचिन वाझेला झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली उचलबांगडी, त्यानंतरचा लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमिवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत.
65 गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बदली
एकूण ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तब्बल ६५ बदल्या या क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यात पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्याचे पोलीस सहआयुक्त प्रशासन राजकुमार व्हटकर यांनी या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळी पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दल, विशेष शाखा, वाहतूक, संरक्षण व सुरक्षा सारख्या विभागात या बदल्या झाल्या आहेत.
वाझेंच्या निकटवर्तींयांचीही बदली
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. या अधिकाऱ्याला गुन्हे शाखा इथून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने या अधिकाऱ्याची सुद्धा एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.