मुंबई - मुंबईत गंभीर कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी याआधीच पालिकेने इंजेक्शन खरेदीसाठी निविदा काढली होती. त्यानुसार काल, सोमवारी 1000 इंजेक्शन पालिकेला मिळाली असून आता लवकरच आणखी 8000 इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर पालिका रुग्णालयात या इंजेक्शनची कमतरता नसून यापुढेही रुग्णांना इंजेक्शनचा तुडवडा भासू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबई पालिकेकडे लवकरच उपलब्ध होणार 8 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन - मुंबई महानगर पालिका
सोमवारी 1000 इंजेक्शन पालिकेला मिळाली असून आता लवकरच आणखी 8000 इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
मुंबईत सप्टेंबर महिन्यात कोरोना संख्या वाढली आहे. 1800 ते 2500च्या घरात रोज रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे साहजिकच ऍक्टिव्ह रुग्ण आणि गंभीर रूग्णही वाढत आहेत. त्यात अनेक गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर द्यावे लागत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. या इंजेक्शनचा वापर मे-जूनपासून सुरू झाला आहे. त्यामुळे पालिकेने याआधी मोठ्या संख्येने इंजेक्शनची खरेदी केली होती. पण आता पालिकेकडे इंजेक्शनचा साठा कमी होता. त्यात इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने इंजेक्शनची टंचाई निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पालिकाही आपला इंजेक्शनचा साठा वाढवण्याच्या मागे लागली आहे.
त्यानुसार पालिकेने एका एजन्सीकडून इंजेक्शन खरेदी केले आहेत. त्यातील 1000 इंजेक्शन सोमवारी उपलब्ध झाले आहेत. या इंजेक्शनचे आवश्यकतेनुसार त्या त्या पालिका रुग्णालयाला वाटप करण्यात आले आहे. तर आता आणखी 8000 इंजेक्शन लवकरच उपलब्ध होणार आहेत. तर यापुढे ही इंजेक्शन लागणार आहेत. तेव्हा त्यासाठी ही खरेदीची प्रक्रिया सुरूच राहील. तेव्हा पालिका रुग्णालयात इंजेक्शनची कुठलीही टंचाई सध्या तरी नाही आणि यापुढे ही भासू दिली जाणार नाही असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.