मुंबई -देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने ( Father of The Nation Mahatma Gandhi ) पावन झालेल्या अनेक वास्तू देशात आहे. यात मुंबईतील मणि भवन ( Mani Bhavan in Mumbai ) या वास्तूचाही समावेश होतो. 1917 ते 1934 अशा दीर्घ कालावधीत महात्मा गांधींचा मणि भवन या वास्तुशी संबंध राहिला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सुरूवातीचा महत्वाचा कालखंड असल्याने यादरम्यान झालेल्या अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार मणि भवन राहिले आहे.
- अनेक महत्त्वाच्या बैठकांचा साक्षीदार मणि भवन
असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा या आंदोलनांसंदर्भातील महत्वाच्या बैठका मणि भवनमध्येच पार पडल्या आहेत. पंडित नेहरूंसह देश-विदेशातील अनेक मोठे नेते गांधीजींना याच ठिकाणी भेटायला यायचे. या वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर गांधीजी राहायचे. स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनदरम्यान ४ जानेवारी १९३२ ला पहाटे याच इमारतीच्या गच्चीवरून गांधीजींना इंग्रजांनी अटक केली होती. २७ आणि २८ जून १९३४ ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही येथे घेण्यात आली. विशेष म्हणजे मणि भवनमध्ये वास्तव्यास असतानाच महात्मा गांधींच्या पेहरावात बदल झालेला आहे आणि याच ठिकाणी गांधीजी चरखा चालवायलाही शिकले.