मुंबई - राज्यात गेल्या चार महिन्यांत तीन वेळा अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात आलेले तौक्ते वादळ आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना आतापर्यंत ७२९ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी वितरीत केल्याची आकडेवारी मदत व पुनर्वसन विभागाने दिली. आजही मदतीसाठी शासन दरबारी खेटे घालणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना, शासनाने दिलेल्या मदतीच्या आकडेवारीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
- सरकार सत्तेत येताच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना -
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार सत्तेत येताच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून आला. कोकणात निसर्ग चक्रीवादळ धडकले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर राज्यातील विविध भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आजही महाविकास आघाडी सरकारची नैसर्गिक आपत्ती आणि आव्हानांनी पाठ सोडलेली दिसत नाही.
- पावसाचा जोरदार फटका -
जूनमध्ये आलेले तौक्ते वादळ तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यातही पावसाने अनेक तालुक्यांमध्ये तुफान फटकेबाजी केली. तौक्ते वादळचा रायगड, चिपळुण, महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. लोकांची घर, सार्वजनिक रस्ते, पूल, विद्यूत पुरवठा, शेती आणि शासकीय इमारतींचे मोठे नुकसान झाले. पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, वृक्षांची, घरांची पडझड झाली. मत्स्य बोटी, जाळे, शेतीचेही नुकसान झाले. दुकानदार व टपरीधारकांची ही वाताहत झाली. सुमारे दीड ते दोन हजार कोटींचे नुकसान झाले. शासनाने यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार कोटींचा निधी वितरीत केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे.
- ऑगस्टमधील १० हजार कोटींचे पॅकेज -
ऑगस्टमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याची दाणादाण उडवली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, विदर्भातील अकोला व अमरावती या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. शेकडो घरे पाण्याखाली गेली होती. चिखलामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने मका, सोयाबीन, डाळिंब, ऊस, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाले. अनेक भागात दरडी कोसळून जीवितहानी झाली. सुमारे सात हजार कोटींचे नुकसान यावेळी झाले. शासन स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच तत्काळ मदतीसाठी १० हजार कोटींच्या निधीचे पॅकेज जाहीर केला. यापैकी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना सुमारे ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी वितरीत केल्याचे मदत व पुनर्वसनाचे स्पष्ट केले आहे.
- अतिवृष्टीत झालेल्या जनावरांचा मृत्यू -