मुंबई - राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police ) शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील ( Home Minister Dilip Walse-Patil ) यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची असणार आहेत. पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे ( २० गुण ), १०० मीटर धावणे ( १५ गुण ), गोळाफेक ( १५ गुण ) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे ( २० गुण ). १०० मीटर धावणे ( १५ गुण ), गोळाफेक ( १५ गुण ) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई ( पुरूष ) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे ( ५० गुण ), १०० मीटर धावणे ( २५ गुण ), गोळाफेक ( २५ गुण ) असे एकूण १०० गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून ओएमआर पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली.
पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखीमध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
हेही वाचा-Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र