महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पाच वर्षांत नालेसफाईवर ७०० कोटी खर्च, तरीही मुंबईची तुंबई - cost drain cleaning mumbai

दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईवर शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जातात. गेल्या पाच वर्षांत सुमारे सातशे कोटींहून अधिक रक्कम नालेसफाईवर खर्च करण्यात आली आहे. हा केलेला खर्च फुकट गेल्याचे दिसत आहे.

drain cleaning mumbai
७०० कोटी खर्च नालेसफाई मुंबई

By

Published : Jun 14, 2021, 8:12 PM IST

Updated : Jun 15, 2021, 11:04 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईत पाणी साचले की रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. पाणी साचल्यावर नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर केले जातात. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईवर शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जातात. गेल्या पाच वर्षांत सुमारे सातशे कोटींहून अधिक रक्कम नालेसफाईवर खर्च करण्यात आली आहे. हा केलेला खर्च फुकट गेल्याचे दिसत आहे.

हेही वाचा -ETV BHARAT IMPACT - अखेर महाज्योतीने 'त्या' शिष्यवृत्तीबाबत युपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाठवले पत्र

नालेसफाई आणि मुंबईची तुंबई -

यावर्षी संपूर्ण मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी १३२ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. २०१८ मध्ये असलेल्या खर्चानुसार ही रक्कम ठरवण्यात आली आहे. दरवर्षी नालेसफाईवर करण्यात येणारा खरच पाहता मुंबईत महापालिकेकडून गेल्या पाच वर्षांत सुमारे ७०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मुंबईत कोरोनाचा प्रसार असताना कामगार गावाला गेल्याने नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नव्हती. यामुळे गेल्यावर्षी मुंबईत पाणी साचले होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट असताना नालेसफाई करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, हा दावा गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसादरम्यान फोल असल्याचे समोर आले आहे. बुधवारी ९ जून आणि शनिवारी १२ जून या दोन्ही दिवसांत पाऊस पडल्याने मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईची तुंबई झाल्याने हिंदमाता, किंग सर्कल, सायन, कुर्ला, अंधेरी सबवे, बांद्रा आदी विभागात पाणी साचते. त्याचा परिणाम मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर होऊन वाहतूक ठप्प होते. तसेच, सायन आणि कुर्ला, चुनाभट्टी आदी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होते. याचा परिणाम म्हणून मुंबई ठप्प होऊन त्याचा त्रास सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतो.

तिजोरीवर डल्ला मारला

दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात, पण किती गाळ काढला, त्याच्या वजनाच्या पावत्या, गाळ कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज, असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत. आम्ही गेली अनेक वर्षे नालेसफाईच्या कामातील फोलपणा प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघड करत आहोत. पण, कंत्राटदारांंना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षांत नालेसफाईच्या नावावर सुमारे 1 हजार कोटींचा घोटाळा करून तिजोरीवर डल्ला मारला आहे, असा आरोप भाजपाचे आमदार व माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. नालेसफाईचा गाळ कुठे नेवून टाकला, याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवण्याचे आवाहन शेलार यांनी महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेला केले आहे.

पाणी साचणार नाही, असा दावा केला नाही-

मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता कमी तासात जास्त पाऊस पडला की पाणी साचते. मुंबईमधील साचलेले पाणी बाहेर समुद्रात सोडले जाते. मात्र, त्यावेळी समुद्राला भरती असल्यास शहरात पाणी साचून राहते. ओहोटी सुरू झाल्यावर शहरातील पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे, काही काळ पाणी साचते. पाण्याचा निचरा करता यावा म्हणून मोठे पंप लावण्यात येते, त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. तसेच, मुंबईमध्ये सहा ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे साचलेले पाणी समुद्रात सोडले जाते. मुंबईमध्ये पाणी साचणार नाही, असा दावा कधीच कोणीही करणार नाही. गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याचा निचरा लवकर होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांणी दिली.

मुंबईत इतके नाले -

महानगरपालिका क्षेत्रातील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किलोमीटर इतकी आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे २४८ किलोमीटर इतकी आहे. तर, छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. या व्यतिरिक्त उर्वरित २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे. या सर्वांमधून गाळ काढण्यासाठी दरवर्षी शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जातात.

हेही वाचा -राज्यातील परिचारिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Last Updated : Jun 15, 2021, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details