महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीकरांसाठी 672 घरे तयार, जानेवारीत डीआरपीकडे होणार हस्तांतरीत - dharavi mhada

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सेक्टर 5 पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 672 घरांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे 672 धारावीकरांचे हक्काच्या आणि टॉवरमधील घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

dharavi houses
धारावी घरे

By

Published : Sep 25, 2020, 5:44 AM IST

मुंबई - अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी झोपडपट्टीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने पाऊल उचलले. मात्र, हा प्रकल्प प्रत्यक्षात अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे हजारो धारावीकरांचे मोठ्या आणि टॉवरमधील घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. असे असले तरी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सेक्टर 5 पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 672 घरांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे 672 धारावीकरांचे हक्काच्या आणि टॉवरमधील घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानुसार आता ही घरे जानेवारी 2021पर्यंत धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. ही घरे हस्तांतरीत झाल्यानंतर या घराचे वितरण डीआरपीकडून पात्र धारावीकरांना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धारावीचा पुनर्विकास काही केल्या मार्गी लागत नसल्याने 2011मध्ये राज्य सरकारने सेक्टर 5मध्ये हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सेक्टर 5चा पुनर्विकास म्हाडाकडे देण्यात आला. धारावी पुनर्विकास मार्गी लागला नसला तरी म्हाडाने मात्र सेक्टर 5मधील पुनर्विकासाचा नारळ फोडत 358 धारावीकरांचे स्वप्न पूर्ण केले. या घरांचा ताबा दिला. मुंबई मंडळाने सेक्टर 5 अंतर्गत पीएमजी कॉलनीजवळच्या मोकळ्या जागेत 5 इमारतीच्या कामाला सुरुवात केली. या इमारतीत 1 हजार 700 घरांचा समावेश आहे. त्यानुसार एक इमारत पूर्ण करत 358 घरे वितरित करण्यात आली आहेत. तर 672 घरांचा समावेश असलेल्या दोन इमारतीचे काम सुरू असताना साधारणतः दोन वर्षांपूर्वी, 2018 मध्ये राज्य सरकारने प्रकल्पात पुन्हा बदल केला आणि सेक्टर संकल्पना मोडीत काढत संपूर्ण धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार म्हाडाकडून सेक्टर 5 काढून घेतले. यानंतर दोन इमारतीचे काम सुरू होते. मात्र, ते पूर्ण करून देण्याची विनंती केली. त्यानुसार मुंबई मंडळाने अखेर आता या दोन्ही इमारतीचे काम 100 टक्के पूर्ण केले आहे. तर घराचा ताबा देण्याच्या दृष्टीने घरे पूर्णतः सज्ज केली आहेत. आता केवळ पाणी येणे बाकी आहे. डिसेंबरपर्यंत पाणी आले की ही घरे धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) सोपण्यात येतील, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, प्रकल्प म्हाडाकडून काढून घेण्यात आल्याने या घरांसाठी पात्रता निश्चित करण्याचे काम आता डीआरपीकडूनच करण्यात येत आहे. त्यामुळे ही घरे डीआरपीकडे सोपवल्यानंतर पात्र रहिवाशांना या घरांचे वितरण करण्यात येईल. याअनुषंगाने आता लवकरच 672 धारावीकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

आणखी 700 घरांचे काम सुरू -

5 पैकी 3 इमारतीचे काम मुंबई मंडळाने पूर्ण केले आहे. तर आता प्रकल्प काढून घेतल्याने उर्वरीत दोन इमारतीचे काम डीआरपीने पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, आता 700 घरांचा समावेश असलेल्या या दोन इमारतीचे काम मुंबई मंडळाने करावे, अशी विनंती राज्य सरकार आणि डीआरपीकडून करण्यात आली होती. ही विनंती ही मंडळाने मान्य केली आहे. त्याप्रमाणे या इमारतीच्या कामाला आता सुरुवात करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. तेव्हा येत्या काळात धारावी पुनर्विकासाअंतर्गत आणखी 700 घरे उपलब्ध होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details