मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेने ठाण्यात डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळून आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाला कळविले आहे. यामुळे डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 66 झाली आहे. लसीचे 2 डोस घेतलेल्या 10 जणांना, तर एक डोस घेतलेल्या 8 जणांना डेल्टाची लागण झाली आहे. आतापर्यंत डेल्टा प्लसमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल; हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंट राहणार 10 वाजेपर्यंत खुली
19 ते 45 वर्ष वयोगटातील रुग्ण -
ठाण्यात डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळूल आला आहे. 50 वर्षीय महिलेला डेल्टा प्लसची लागण झाली होती. 22 जुलै रोजी या महिलेला सौम्य स्वरुपाचा कोविड आजार झाला होता. ती महिला यातून बरी झाली आहे. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 66 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 34 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत, तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्ष वयोगटातील 18 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत. 66 पैकी 31 रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत.
लस घेतलेल्या 18 जणांना लागण
डेल्टा प्लसच्या 66 रुग्णांपैकी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या 18 जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. 18 जणांपैकी 10 जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर, 8 जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी 2 व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतरांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.