मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसभरात धारावीत ६२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी प्रमाणेच दादरमध्ये ६४ तर माहीममध्ये ८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता २३७ वर पोहचली आहे. दादरमध्ये ३८२ तर माहीममध्ये ४७९ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
धारावीत ६२, दादरमध्ये ६४ तर माहीममध्ये ८६ नवीन रुग्णांची नोंद - dadar corona
धारावीतील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता २३७ वर पोहचली आहे. दादरमध्ये ३८२ तर माहीममध्ये ४७९ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
धारावी सहावेळा शून्यावर
मागील वर्षीच्या मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारखी दाटीवाटीची झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. यानंतर पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरु केल्या. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबविण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या ४ टी मॉडेलला धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले. जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. सक्रीय रुग्णांची संख्याही घटली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा आणि २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
कोरोना पुन्हा वाढला
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असताना मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या आता ५१८५ वर पोहचली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोके वर काढले आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. बुधारी धारावीत ६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत रुग्णांची संख्या ४५३१ वर पोहचली आहे. यातील ३९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३७ सक्रीय रुग्ण आहेत.
माहीममध्ये ४७९ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर आणि माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आतापर्यंत ५६०३ रुग्ण आढळले. यातील ५०५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे येथे ३८२ सक्रीय रुग्ण आहेत. माहिमध्ये आतापर्यंत रुग्णांची संख्या ५६१३ वर पोहचली आहे. यातील ४९७९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथे ४७९ सक्रीय रुग्ण आहेत.
लसीकरण आणि चाचण्या
मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतरही धारावीमधील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी महापालिकेने धारावीत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीत दिवसाला १ हजार लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. तसेच फेरीवाले, दूधवाला, दुकानदार आदी ज्या लोकांचा नागरिकांशी रोज संपर्क येतो अशा लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.