मुंबई -मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत आज वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 6123 नवे रुग्ण आढळून आले असून, कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईत 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 6123 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 91 हजार 751 वर पोहोचला आहे. आज 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 641 वर पोहोचला आहे. 2294 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 37 हजार 555 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 41 हजार 609 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 63 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 53 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 551 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 39 लाख 36 हजार 930 चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हे विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात महापालिकेने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.