मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौक्ते' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वादळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्रसह गुजरातमधून धावणाऱ्या तब्बल 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट-
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौक्ते' चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने तब्बल 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहेत.