मुंबई- देशभरात सहा हजार रेल्वे स्थानकांवर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल)ने नि:शुल्क वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा नुकताचा विक्रम केला आहे. सहा हजारावा वायफाय पूर्व मध्य विभागातील हजारी बाग येथे बसविण्यात आला आहे. प्रवाशांना दरदिवशी पहिले 30 मिनिटे वायफाय मोफत मिळणार असून, त्यानंतर वायफाय वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
असा घडला इतिहास..?
रेल्वे स्थानकांना डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने, रेल्वे स्थानकात सार्वजनिक वायफाय उपलब्ध करण्याचे काम दिले आहे. अवघ्या 5 वर्षात भारतील 6 हजार रेल्वे स्थानकांवर वायफाय लावण्यात आलेला आहे. जानेवारी 2016 मध्ये रेलटेलद्वारे सर्वात पहिल्या वायफाय पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर बसविण्यात आला आहे. 1000 वा मध्य रेल्वेच्या रे रोडवर स्थानकात, 1500 वा उत्तर रेल्वेच्या सहीबाबाद स्थानकात, 2000 वा उत्तर पश्चिम रेल्वेच्या राणा प्रताप नगर स्थानकात, 3000 वा उत्तर पश्चिम रेल्वेच्या एलनाबाद स्थानकात, 4000 वा पूर्वोत्तर सीमा रेल्वेच्या तिनसुकिया जं. स्थानकात, 5000 वा दक्षिण पूर्व रेल्वेच्या मिदनापुर स्थानकात आणि 6000 वा वायफाय पूर्व मध्य विभागातील हजारी बाग येथे बसविण्यात आला आहे.
34 एमबीपीएसपर्यंत हायस्पीड वायफाय
कोरोना महामारीच्या काळात कोरोना नियंत्रणात करण्यासाठी काही महिने वायफाय बसविण्याचे काम थांबविण्यात आले होते. यावेळी अत्यावश्यक सामग्री, मनुष्यबळ कमी असल्याने काम थांबले होते. लाॅकडाऊन हटविण्यात आल्यानंतर तत्काळ जोमाने कामे हाती घेण्यात आले. रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा वापरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 1 एमबीपीएस गतीने प्रतिदिन 30 मिनिटांपर्यंत मोफत वायफायची सुविधा मिळेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी आता 34 एमबीपीएसपर्यंत हायस्पीड वायफाय सुविधा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशांना नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रवाशांना आवश्यकतेनुसार सशुल्क प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. सध्या ही योजना 4 हजार रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही रेल्वेस्थानकात ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती 'रेलटेल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी ईटीव्ही भारतला दिली.