महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इंग्लंड येथून ६०० प्रवासी मुंबईत, एकही पॉझिटिव्ह नाही - Mumbai airport news

मुंबई विमानतळावर इंग्लंड येथून ३ विमान आली आहेत. मुंबईत आलेल्या विमानात एकही प्रवासी पॉझिटिव्ह आढळला नाही.

mumbai
mumbai

By

Published : Dec 22, 2020, 4:27 PM IST

Updated : Dec 22, 2020, 5:08 PM IST

मुंबई- ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून भारतात येणारी विमाने २३ डिसेंबरपासून रद्द करण्यात आली आहेत. काल आणि आज या दोन दिवसात एकूण ५ पैकी ३ विमाने ब्रिटन येथून मुंबईत आली आहेत. या तीन विमानातून एकूण ६०० प्रवासी मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यापैकी एकालाही व्हायरसची लागण झाल्याचे समोर आलेले नाही. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

३ विमान, ६०० प्रवासी

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २३ डिसेंबरपासून भारतात एकही विमान उतरू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यापूर्वी २१ डिसेंबर रात्री दोन, २२ डिसेंबरला सकाळी दोन तर रात्री एक अशी पाच विमाने येणार होती. त्यापैकी एक विमान रद्द झाल्याने सकाळपर्यंत ३ विमाने मुंबईत आली आहेत. या विमानांमधून एकूण ६०० प्रवासी मुंबईत आले. या ६०० प्रवाशांची तपासणी मुंबई एअरपोर्टवर करण्यात आली असता एकाही प्रवासी व्हायरसची लागण झालेला आढळून आलेला नाही, असे काकाणी यांनी सांगितले.

राज्याबाहेरच्यांना त्यांच्या राज्यात क्वारंटाइन करणार

मुंबई एअरपोर्टवर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले जात आहे. काल रात्री काही प्रवाशांनी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही क्वारंटाइन होणार नाही, आम्हाला आमच्या राज्यात घरी जाऊ द्या, असे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात जायचे आहे, त्या राज्याच्या मुख्य सचिवांना तशा सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या राज्यात त्या प्रवाशांना क्वारंटाइन केले जाणार आहे. तोपर्यंत त्या प्रवाशांना मुंबईत निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

कारवाई सुरूच राहणार

मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असताना, ड्रॅगन फ्लाय या क्लबवर पोलीस आणि मुंबई महापालिकेने कारवाई केली. याबाबत बोलताना याआधीही ज्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त लोक एकत्र येतात त्याठिकाणी कारवाई सुरू आहे. याआधीही कारवाई करण्यात आली आहे. पालिकेची पथके गस्त घालत आहेत, क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळून आल्यास, विनामास्क लोक आढळून आल्यास त्यांच्यावर पालिकेच्या, साथ नियंत्रण कायदा व मुंबई पोलिसांच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे काकाणी यांनी सांगितले.

विमानांनी आलेले प्रवासी

ब्रिटन येथून मुंबईत एकूण ३ विमानाने ५९० प्रवासी मुंबईत एअरपोर्टवर आले. त्यापैकी १८७ मुंबईमधील, १६७ महाराष्ट्रातील तर २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत. AI-१३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ६३ मुंबईमधील, ७५ महाराष्ट्रातील तर ११२ राज्याबाहेरील आहेत. VS-३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबईमधील, ३० महाराष्ट्रातील तर ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत. BA-१३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.

Last Updated : Dec 22, 2020, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details