मुंबई -कोरोनाकाळात पहिल्या दिवसांपासून कर्तव्य बजावत असलेल्या एसटी महामंडळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोरदार मुसंडी मारली आहे. अवघ्या २६ दिवसात ६० कर्मचाऱ्यांनी काेराेनाने बळी घेतला आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली असून आता एसटी महामंडळाने आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमण्याची घोषणा केली आहे.
धक्कादायक : कोरोनामुळे २६ दिवसांत ६० एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट
कोरोनामुळे २६ दिवसांत ६० एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या बाबत एसटी महामंडळाने आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमण्याची घोषणा केली आहे.
७ हजार २३९कर्मचारी काेराेनाबाधित -
टाळेबंदीमध्ये एसटीची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मुंबई, ठाणे, पालघर येथील अत्यावश्यक सेवेकऱ्यांची वाहतूक एसटीने केली. तसेच बेस्टच्या मदतीसाठी एसटीच्या एक हजार बसेस चालविण्यात आल्या. मजूर, विद्यार्थ्यांची वाहतूक केली. त्यानंतर राज्यातील एसटीची वाहतूक सुरू झाली. सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण हाेण्याचे प्रमाण कमी हाेते. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच काेराेनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. २६ एप्रिलपर्यंत ७ हजार २३९कर्मचारी काेराेनाबाधित झाले असून त्यापैकी ५ हजार ५७० कर्मचारी बरे झालेत. सध्या १ हजार ४९१ कर्मचारी उपचार घेत आहेत. २६ एप्रिल राेजी १४९ कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाल्याची माहिती महामंडळाने दिली. एसटीमध्ये दिवसाला सुमारे दीडशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण हाेत आहे.
'सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, एसटीमध्ये दिवसाला २०० कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा होत असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही विशेष उपाययोनां एसटी महामंडळाने तीव्रता लक्षात आल्यानंर सुद्धा केलेल्या नाहीत. अल्प वाहतूक सुरू असताना व कोरोनाची चाचणी केल्याचे सांगून सुद्धा चालकांना हजेरीसाठी आगारात सक्तीने बोलावण्याचे भ्याड काम काही आगारात अजूनही चालु आहे. टेस्ट झाल्याचे सांगून सुद्धा रिपोर्ट यायच्या अगोदरच कामगिरीवर जाण्याची बळजबरी काही आगारात केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीव गेल्यानंतर आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमणे हे उशिरा सुचलेले शहाणपण असून काही निर्दयी आगार व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
फक्त ११ कर्मचारी पात्र
एसटीत फक्त चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनाच ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. इतर कर्मचाऱ्यांचा मात्र विचार केलेला नाही. काेरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झाली नाही. मृतांमध्ये चालक-वाहकांची संख्या माेठी आहे. सध्या फक्त ११ कर्मचारी आर्थिक मदतीसाठी पात्र ठरलेत.