महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत आज 6 हजार 23 लाभार्थ्यांना लस, उद्याही लसीकरण सुरू राहणार - कोरोना लसीकरणा बद्दल बातमी

मुंबईत आज 6 हजार 23 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. रविवारी सुद्धा लसीकरण सुरु राहणार आहे.

6 thousand 23 beneficiaries were vaccinated in Mumbai today
मुंबईत आज 6 हजार 23 लाभार्थ्यांना लस, उद्याही लसीकरण सुरु राहणार

By

Published : May 1, 2021, 10:31 PM IST

मुंबई -आजपासून देशभरात 18 ते 44 वयामधील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत 5 लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील 992 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ज्यांना कोविन अ‌ॅपवरून मेसेज आला त्यांनाच 5 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात आली. उद्याही या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. आज एकूण 6 हजार 23 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत शनिवारी 6 हजार 23 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 3 हजार 393 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 630 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 लाख 63 हजार 154 लाभार्थ्यांना पहिला तर 4 लाख 90 हजार 987 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 720 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 27 हजार 209 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 80 हजार 076 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 62 हजार 144 तर 18 ते 44 वर्षामधील 992 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

इतर लसीकरण बंदच -
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने रविवारपर्यंत तीन दिवस लसीकरण बंद ठेवले आहे. वॉक इन लसीकरण बंद करण्यात आले आहे. जो काही लसीचा साठा बाकी आहे तो फक्त दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना 5 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात आली. रविवारीही 5 केंद्रांवर लस दिली जाणार आहे. आज प्रत्येक केंद्रांवर 200 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. उद्या प्रत्येक केंद्रांवर 500 लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरणादरम्यान गोंधळ -
आज 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यावेळी ज्यांना कोविन अ‌ॅपमधून मेसेज आलेला आहेत, अशा लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार होती. मात्र, त्यानंतरही अनेकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली होती. यामुळे अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात गोंधळ उडाला होता. राजावाडी रुग्णालयात अनेकांना लसीकरणाला येण्याचे मेसेज आले. मात्र, लसीकरणाच्या यादीत त्यांची नावे नव्हती. अखेर सायंकाळी केंद्र सरकारच्या कोविन अ‌ॅपशी संपर्क साधल्यावर त्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,83,720
फ्रंटलाईन वर्कर - 3,27,209
जेष्ठ नागरिक - 9,80,076
45 ते 59 वय - 8,62,144
18 तर 44 वय - 992
एकूण - 24,54,141

ABOUT THE AUTHOR

...view details