मुंबई- घाटकोपरमधील जागृती नगर येथील एका इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्येही संरक्षक भिंत कोसळली; ४ वाहनांचे नुकसान - घाटकोपर
घाटकोपर येथे एकविरा दर्शन सोसायटीची संरक्षक भिंत पार्क केलेल्या 5 ते 6 वाहनांवर कोसळली. यामुळे ४ वाहनांचे नुकसान झाले आहे.
घाटकोपर पश्चिम जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ एकविरा दर्शन सोसायटी आहे. मुंबईत शुक्रवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली. सुरक्षा भिंत कोसळताना सोसायटीमधील दोन वाहनांचे तर भिंत पडल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन अशा एकूण चार वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस दलाचे जवान दाखल झाले आहेत. रस्त्यावर पडलेला भिंतीचा मलबा बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या दुर्घटनेत वाहनांचे नुकसान झाले असले, तरी कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.