मुंबई - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील काही आगारात कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही संप मागे घेण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, संप सुरूच ठेवला आहे. राज्यातील ५९ आगार या संपामुळे बंद पडले असून, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
- विदर्भात-मराठवाड्यात संपाची तीव्रता -
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले आहे. तरीही विविध आगारातील, वेगवेगळ्या स्तरावरील कामगारांनी नियमबाह्य आंदोलन, संप, निर्देशने सुरू ठेवली आहेत. आता या संदर्भात संघर्ष एसटी कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी एसटी महामंडळाला आज मध्यरात्रीपासून संप पुकारल्याची नोटीस दिली होती.
संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात काल आव्हान दिले. या याचिकेवर काल रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरीसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेशाला केळाची टोपली दाखवत, आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. या संपामुळे राज्यातील ५९ आगार बंद पडले आहेत. विशेष म्हणजे या संपाची तीव्रता सर्वाधिक जास्त मराठवाडा आणि विदर्भात दिसून येत आहे.
- खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट -
खेडोपाड्यात जाण्यासाठी लालपरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दिवाळीच्या हंगामामुळे खरेदीसाठी प्रवासी घराबाहेर पडतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहतूकदारांकडून एसटीच्या तिकीटाच्या दुप्पट ते तिप्पट भाडे आकारत आहेत. वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवाशांची वाहतूक खासगी वाहतूकदारांकडून सर्रास सुरु आहे. वाहतूक पोलीस प्रशासनानेही याकडे कानाडोळा केल्याने खासगी वाहतूकदारांचे फावले आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागाला संपाची तीव्रता अधिक असल्याने येथे सर्वाधिक फटका बसला आहे. आधीच तोट्यात गेलेल्या एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्याची गरज असताना, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रवाशांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.