मुंबई - उपनगरीय लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांची मासिक पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर लगबग सुरू आहे. मागील दोन दिवसात 55 हजार लसधारकांनी मासिक पास काढला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी 34 हजार 353 आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 20 हजार 637 प्रवाशांनी ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून मासिक पास काढला आहे.
६१७ तिकीट खिडक्या उघडल्या -
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया कालपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पास मिळावा यासाठी मध्य रेल्वेवर ३४१ आणि पश्चिम रेल्वेवर २७६ अशा ६१७ तिकीट खिडक्या उघडल्या आहे.
दोन दिवसात 55 हजार पास -
पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेवर 11 हजार 664 आणि मध्य रेल्वेवर 22 हजार 689 नागरिकांनी मासिक पास घेतला. तर, दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहावाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर 5 हजार 949 आणि मध्य रेल्वेवर 14 हजार 688 जणांनी मासिक पास काढले. त्यामुळे मागील दोन दिवसात 54 हजार 990 नागरिकांनी मासिक पास काढले असून 15 ऑगस्ट रोजीपासून हे नागरिक लोकल प्रवास करू शकतात.
असा मिळवा ई-पास -
- सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.orgही वेब लिंक उघडावी.
- त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.
- त्यानंतर नागरिकांनी आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
- लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभ धारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभ धारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील. त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
- या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे.
- मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन (save) करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.
उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील ऑफलाइन कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत ऑनलाइन ई-पास पद्धत देखील सुरु झाल्याने पात्र सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा -मुंबईत डेल्टाप्लस रुग्णाचा मृत्यू; दोनदा लस घेतल्यानंतरही अंत