मुंबई -रविवारी दुपारीपर्यंत राज्यामध्ये कोरोनाचे ५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६९०वर पोहोचली आहे. तसेच, राज्यात आज कोरोनाचे चार नवे बळी आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३६वर पोहोचली आहे.
आज नोंद झालेल्या ५५ रुग्णांपैकी मुंबईमध्ये २९, पुण्यात १७, पिंपरी चिंचवडमध्ये चार, नगरमध्ये तीन तर औरंगाबादमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.
तर पुण्यामध्ये दुपारपर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका ६० वर्षीय महिलेला मृतावस्थेत ससून रुग्णालयात आणले होते. या महिलेच्या घशातील द्रव (स्वॅब) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, एका ५२ वर्षीय व्यक्तीचाही ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यासोबत, पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे एका 69 वर्षीय महिलेला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट रुग्णालयात 30 मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या ठिकाणी उपचार न करता त्यांना औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी उपचारदरम्यान मृत्यू झाला.
पुण्यानंतर औरंगाबादमध्येही एका कोरोनाबाधित ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीची कोरोना चाचणी झाली होती व त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता. यानंतर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे.
हेही वाचा :देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४; ७७ जणांचा मृत्यू..