मुंबई- कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रयत्न केले जात असताना फ्रंटलाईन वॉरीयर म्हणून पोलिसांना कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र अद्यापही मुंबई पोलीस खात्यात काहीजण लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई शहरातील वेगवेगळ्या पोलीस उपायुक्तांना या संदर्भात लस न घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांची माहिती मागवली असून यातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी लस का घेतली नाही, याचे कारण देण्यास सांगितले आहे.
5000 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लस घेतली नाही
मुंबई पोलीस खात्याच्या मनुष्यबळापैकी आतापर्यंत 36 हजार 93 पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर 26 हजार 277 पोलिसांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. तब्बल 41 हजार मनुष्यबळ असलेल्या मुंबई पोलीस खात्यातील जवळपास 5000 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोरोना लसीचा पहिला डोस न घेतल्याची बाब समोर आली आहे. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेला असताना फ्रंटलाईन वॉरीयर म्हणून काम करणाऱ्या पोलीस खात्यामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पहिल्या टप्प्यात 87 टक्के लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे केवळ 64 टक्केच करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. असे असताना काही पोलीस अधिकारी व अंमलदार कोरोनाची पहिली लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.