महाराष्ट्र

maharashtra

राज्यात नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे सुरू होणार - मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Aug 11, 2021, 10:06 PM IST

Updated : Aug 11, 2021, 10:20 PM IST

महिलांसाठी पूर्वीची योजना केंद्र शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या 75: 25 टक्के हिस्सा या तत्त्वावर चालत होती. आताची ही सुधारित स्वरुपातील योजना केंद्र शासनाचे 60 टक्के, राज्य शासनाचा 15 टक्के आणि स्वयंसेवी संस्थेचा 25 टक्के या तत्त्वावर राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

मुंबई - नोकरदार महिलांसाठी मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच जिल्ह्यांच्या ठिकाणी निवासासाठी भाडेतत्त्वावर वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. आज (बुधवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. महिलांना सुरक्षित निवासाचे ठिकाण आणि प्रगतीच्या संधी विस्ताराव्यात हा या मागचा हेतू असल्याची प्रतिक्रिया महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर


महिलांसाठी पूर्वीची योजना केंद्र शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या 75: 25 टक्के हिस्सा या तत्त्वावर चालत होती. आताची ही सुधारित स्वरुपातील योजना केंद्र शासनाचे 60 टक्के, राज्य शासनाचा 15 टक्के आणि स्वयंसेवी संस्थेचा 25 टक्के या तत्त्वावर राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. इमारत बांधकामासाठी जागेची अनुपलब्धता, बांधकामसाठी लागणारा कालावधी आणि तसेच खर्च आदी बाबी लक्षात घेता ही योजना राबवण्यास इच्छुक असलेल्या संस्थेला त्यांच्या इमारत भाड्याकरिता वार्षिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री ठाकूर यांनी दिली आहे.

'या' जिल्ह्यात वसतिगृहे

मुंबई उपनगर जिल्ह्यात 6, मुंबई शहर जिल्ह्यात 4, ठाणे जिल्हा- 4, पुणे जिल्हा - 4 आणि राज्यातील उर्वरीत 32 जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 1 या प्रमाणे प्रति वसतिगृह 100 प्रवेशक्षमतेची एकूण 50 वसतीगृहांची योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठीच्या वसतीगृहाच्या इमारतीसाठीचे फर्निचरसाठी केंद्र-राज्य 60:40 टक्के याप्रमाणे 50 वसतिगृहांसाठी एकूण राज्य हिस्सा 1 कोटी 50 लाख रुपये एकरकमी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वसतिगृहाच्या भाड्यासाठी राज्य शासनाचा 15 टक्के हिस्सा याप्रमाणे प्रतिवसतिगृह 1 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे प्रतिवर्ष 75 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. भाडे आणि फर्निचरचा खर्च मिळून एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे अशा महानगरात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे. एकल महिला, विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत, अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी 30 टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे अशा महिलांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यास प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद मंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Aug 11, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details