महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! वडाचे झाड तोडणाऱ्या ५ बोगस पालिका कर्मचाऱ्यांना अटक

गावदेवी येथील चौपाटी रोडवरील एक जुने वडाचे झाड कापण्यात आले आहे. एका जाहीरात बोर्डाला अडथळा होतो म्हणून हे झाड कापण्यात आल्याचा संताप जनक प्रकार घडला आहे. महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवत ५ जणांनी हे झाड कापले. त्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

chopping down trees
वडाचे झाड कापण्यात

By

Published : Feb 8, 2021, 7:11 PM IST

मुंबई - गावदेवी येथील चौपाटी रोडवरील एक जुने आणि मोठे वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या रात्री कापण्यात आले. अनधिकृतरित्या हे झाड कापण्यात आले असून केवळ जाहिरातीचा फलक दिसावा यासाठी हे झाड कापण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आता यापुढे जात आणखी एक गंभीर आणि धक्कादायक माहिती याप्रकरणी समोर आली आहे. महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून हे झाड कापणाऱ्या ५ जणांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

३ फेब्रुवारीला पहाटे साडे पाचच्या सुमारास डॉ. अनहिता पुंडोले या गावदेवी येथील चौपाटी रोडवरून जात होत्या. यावेळी त्यांना डिव्हायडरमधील एक मोठे वडाचे झाड कापण्यात आल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लागलीच तिथे धाव घेतली. यावेळी झाड पूर्णपणे कापण्यात आले होते आणि बाजूला काही लोकं होते. त्यांच्याकडे डॉ. अनहिता यांनी याबाबत विचारणा केली असता त्या लोकांनी आपण पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी झाड कापण्यासाठीच्या परवानगीची कागदपत्रे विचारली. पण त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे डॉ. अनहिता यांनी थेट पालिकेच्या संबंधित वृक्ष अधिकाऱ्याकडे तक्रार केली.

त्याच दिवशी गुन्हा दाखल

डॉ. अनहिता यांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अनधिकृतरित्या झाडं कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर समोरच्या एका जाहिरातीच्या फलकात हे झाडं अडसर बनत होते. म्हणून झाड कापण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली. त्यानुसार या अधिकाऱ्याने याप्रकरणी जाहिरातीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत अखेर ५ जणांना अटक केली आहे.

'ही' बाब गंभीर - जितेंद्र परदेशी

पोलिसांनी ज्या ५ जणांना अटक केली आहे त्यांनी पालिका कर्मचारी असल्याचा बहाणा करीत झाड कापले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून आम्ही ही याची तितक्याच गांभीर्याने दखल घेतली आहे. अधिकाधिक कडक कारवाई या ५ जणांवर व्हावी ही आमची ही मागणी आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र परदेशी, उद्यान आणि वृक्ष अधिकारी, पालिका यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. तर असे गंभीर प्रकार रोखण्यासाठी काय कडक आणि धोरणात्मक उपाययोजना करता येतील यावर आम्ही विचार करत असून तसे धोरण ही प्रत्यक्षात आणू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे यांच्याकडून अजमेरच्या 'ख्वाजा गरीब नवाज' दर्ग्याला चादर

ABOUT THE AUTHOR

...view details