मुंबई -तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 49 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती
बचावकार्यासाठी आयएनएस कोची पुन्हा समुद्रात
आयएनएस कोची हे जहाज पुन्हा एकदा पी 305 बार्जवर मदतकार्यासाठी अरबी समुद्रात गेले आहे. आयएनएस कोलकाता हे जहाज बुधवारी रात्री उशिरा नेव्हल डॉकमध्ये परतले आहे. अजूनही पी 305 बार्जवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. या बरोबरच कोस्टगार्डकडून सुद्धा भारतीय नौदलाला मदत केली जात आहे. अरबी समुद्रातील पी 305 बार्ज जवळच्या परिसरामध्ये भारतीय नौदलाच्या एअरक्राफ्ट व जहाजांकडून शोध कार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेबद्दल येलोगेट पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
188 कर्मचाऱ्यांची सुटका
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा -माझ्या पतीला शोधा - बेपत्ता राध्येशाम ठाकूर यांच्या पत्नीची प्रशासनाला विनंती