मुंबई - स्वतःच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नियुक्त करणाारे मुंंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आता आपल्या शासकीय बंगल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या बंगल्यावर गेल्या आठ वर्षात एक कोटी रुपये खर्च करण्यात आले असून आता पुन्हा खर्च केला जात आहे.
कोरोना काळात आयुक्तांकडून बंगल्याच्या दुरुस्तीवर खर्च केला जात असल्याने महापालिकेतील विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाची महामारी असतांना अशी उधळपटटी योग्य नसल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
चार वर्षात पुन्हा दुरूस्ती…
मलबार हिल येथे पालिका आयुक्तांचा बंगला आहे. 2016 मध्ये पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताचा तात्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी या बंगल्यावर 50 लाख रुपये खर्च केले होते. चार वर्षात या बंगल्यावर पुन्हा 40 लाख रुपयांचा खर्च केला जात आहेत. आयुक्तांचा बंगला हेरिटेज भागात आहे. पावासाचे पाणी छतांमधुन आत झिरपत असून या इमारतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे, महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
भाजपाचे महानगरपालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी या खर्चाबाबत टीका केली असून पालिकेची ही उधळपटटी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तर पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी देखील आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला आहे. बंगल्याच्या दुरूस्तीसाठी खर्च केला जात आहे. मात्र, किती खर्च केला जात आहे, याची आपल्याला माहिती नाही. कोरोनाची महामारी असताना अशी उधळपटटी योग्य नसल्याचे राजा यांनी म्हटले आहे.
आठ वर्षात दिड कोटी खर्च…
मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेल्या आठ वर्षात दुरूस्तीसाठी दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. २०१२ मध्ये २९ लाख ३० हजार, २०१६ मध्ये ५० लाख, तर गेल्या वर्षी देखील काही लाख रूपये खर्च केले आहेत. आता पुन्हा ४० लाख रुपयांचा खर्च केला जात आहे.