मुंबई - श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या आणि सुमारे दीड कोटी नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार 128 पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. पालिकेत सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत एकूण 1 लाख 10 हजार 509 पदे मंजूर असून त्यापैकी 38 हजार 128 पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे ही क आणि ड वर्गाची असून त्याची संख्या 33,043 आहे.
मुंबई महानगरपालिकेत 38 हजार 128 पदे रिक्त; माहिती अधिकारातून बाब उघड अशी आहेत रिक्त पदे -
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेकडे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनाने अनिल गलगली यांना सप्टेंबर 2020 पर्यंतच्या मंजूर आणि रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. यात सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 87,146 पदे मंजुर असून 28,608 पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक क गटात 10,553 तर ड वर्गात 15,789 पदे रिक्त आहेत. यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 23,363 पदे मंजुर असून 9520 पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ड वर्गात 5020 पदे रिक्त आहेत. क आणि ड वर्गात दोन्ही संवर्गात 33,043 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदे लवकर भरा -
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी. रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो, असे गलगली यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा-समाजहिताच्या कामांमध्ये अशोक चव्हाण यांनी राजकारण करू नये - चंद्रकांत पाटील