मुंबई -एसटी महामंडळाचा विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संपाचा आज 12 वा दिवस आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 247 आगार बंद राहिले होते. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर एसटी महामंडळाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. आज दिवसभरात 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्यातील 45 एसटी आगारातील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
या आगारातील एसटी कर्मचारी निलंबित
कळवण आगारातील 17, वर्धा, हिंगणघाट आगारातील 40, अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील 14, चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील 14, औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर आगारातील 31, किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगांव, मुखेड, बिलोली, देगलूर आगारातील 58, तुमसर, तिरोडा, गोंदिया आगारातील 30, अक्कलकोट आगारातील 2, पांढरकवडा, राळेगावं, यवतमाळ आगारातील 57,औरंगाबाद आगारातील 5, हिंगोल, गंगाखेड आगारातील 10, जाफराबाद, अंबड आगारातील 16, गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर आगारातील 18, धुळे आगारातील 2, जत, पलूस, इस्मामपूर, आटपाडी सागरातील 58 असे राज्यभरातील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा-एसटीचे विलिनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार; एसटी कर्मचारी संघटना आक्रमक
247 आगार बंद -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ताची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने 28 ऑक्टोबर रात्रीपासून उपाेषण मागे घेतले. परंतु विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांंनी संप सुरुच ठेवला आहे. कृती समितील 23 कामगार संघटनांनी विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तरी 22 संघटना संपात सहभागी झाल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधावरी आव्हान दिले होते. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेशाला केराची टोपली दाखवत संप सुरुच ठेवला आहे. या संपाला आज 12 दिवसपूर्ण झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राज्यातील 250 आगारांपैकी 247 आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे.
हेही वाचा-...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार
आज फक्त तीन आगार सुरू-
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप चिघळला आहे. राज्यातील 99.99 टक्के डेपो बंद पडले आहे. शनिवारी एसटीचे तब्बल 65 डेपाे, रविवारी 127 डेपो, सोमवारी 240 डेपो बंद राहिले आहेत. तर आज राज्यातील 250 एसटी डेपोपैकी 247 डेपो बंद ठेवले होते. एसटी महामंडळाचा कोल्हापूर विभागातील गारगोटी, कागल डेपो आणि नाशिक विभागातील इगतपुरी डेपो असे तीनच डेपो सुरु होते. दिवाळी सण साजरा करून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची या संपामुळे प्रचंड हाल झाले आहेत.