मुंबई -वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून 2019 पासून ई चलान कारवाई करण्याची सुरुवात केली आहे. ई-चलान अंमलात आल्यापासून दिवसागणिक थकीत दंडाची रक्कम वाढत जात असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईकरांकडे तब्बल 315 कोटी रुपये दंड थकविल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईकरांकडे तब्बल 315 कोटींचा वाहतूक दंड थकीत, 2 हजार चालकांचे लायसन्स रद्द
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून 2019 पासून ई चलान कारवाई करण्याची सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईकरांकडे तब्बल 315 कोटी रुपये दंड थकविल्याची माहिती समोर येत आहे.
अशी आहे आकडेवारी -
मुंबई वाहतूक पोलिसांनी 2020 मध्ये तब्बल 50 लाख 95 हजार 478 वाहन चालकांवर कारवाई करत त्यांना ई चलनाद्वारे 148 कोटी 16 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील तब्बल 41 लाख 40 हजार 799 चालकांनी दंडाची रक्कम थकवल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, मुंबईकरांकडील थकीत दंडाचा आकडा 112 कोटी 43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर 2019 मध्ये वाहतूक पोलिसांनी 49 लाख 38 हजार 485 वाहन चालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती. त्यातून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेनंतर तब्बल 102 कोटी रुपयांचा दंड थकला होता.
आता दंड वसुलीसाठी कॉल सेंटर-
वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकाच्या वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढत असतात. त्यानंतर ई-चलानच्या दंडाची माहिती वाहनमालकाला मोबाइल संदेशाद्वारे पाठविली जाते. हा दंड वाहनचालकांना पोलिसांच्या विविध संकेतस्थळे तसेच पोलिसांकडे डेबिट कार्डद्वारे भरता येतो. मात्र अनेकदा वाहनचालकही दंडाची रक्कम भरत नाहीत. त्याचा परिणाम सरकारच्या महसुलावरही होत आहे. त्यामुळे थकीत असलेला दंड वसूल करण्यासाठी आता कॉल सेंटर सुरू केले आहे. या कॉल सेंटरमधून दंडाची रक्कम थकवलेल्या चालकाला कॉल केला जातो.
दंड वसुलीसाठी पोलीस पोहोचणार घरी -
कोरोनामुळे दंडाची रक्कम वसूल करण्यास दिरंगाई झाली आहे. सध्या कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. त्यामुळे कॉल केल्यानंतरही दंड न भरणाऱ्या चालकाच्या घरी थेट वाहतूक पोलीस वसुलीसाठी पोहोचणार आहेत. तसेच संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.
2 हजार वाहन चालकांचे लायसन्स रद्द-
गेल्या महिन्यात कॉल सेंटरमधून 4 हजार 600 वाहनचालकांना कॉल करून दंड भरण्यास सांगितले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कॉलनंतर 2 हजार 596 प्रकरणात 1 कोटी 12 लाख रुपयांची दंड वसुली झाली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतरही दंड न भरणाऱ्या 2 हजार वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळत आहे.