सातारा :. थर्टीफस्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी महाबळेश्वर मध्ये दाखल झालेल्या पर्यटकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. येथील कमाल पारा 14 अंश सेल्सिअस इतका खाली उतरला आहे. हवेतील गारवा आणि नववर्षाचे सेलिब्रेशन त्या पार्श्वभूमीवर वाईन शॉप मध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत...
21:44 December 31
19:14 December 31
'सीएसटी'ला आकर्षक रोषणाई..
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे.
19:09 December 31
महाबळेश्वरमध्ये यंदाच्या वर्षी पर्यटकांची संख्या रोडावली; नाईट कर्फ्यूमुळे नाराजीचा सूर
सातारा - महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर मध्ये मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहात आनंदात स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालेली आहे गतवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वर काहीसा कमी असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कोरोनाची पार्श्वभूमी आणि रात्री दहानंतर संचारबंदी यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
18:53 December 31
2020चा सूर्य मावळला; पाहा जुहू चौपाटीवरील दृष्ये..
२०२०चा अखेरचा सूर्यास्त; पाहा जुहू बीचवरील दृष्ये..
16:55 December 31
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जुहू बीचवर काय परिस्थिती?
नववर्षाचे आगमन होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर जुहू बीचवर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी...
15:56 December 31
कोल्हापूरात तब्बल 2 हजारांहून अधिक पोलीस असणार रस्त्यांवर; हुल्लडबाजांवर नजर..
कोल्हापूर : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज सायंकाळी तब्बल दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर असणार आहेत. दरवर्षी अनेक मद्यपी आणि हुल्लडबाजांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. यावर्षी सुद्धा अशा हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर असणार असून सायंकाळी साडेपाच नंतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर शहरात साडे पाचशे पेक्षा जास्त पोलीस रस्त्यावर पाहायला मिळणार असून मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर विशेष करून कारवाई सुद्धा केली जाणार आहे. याच संपूर्ण पार्श्वभूमीवर अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
14:56 December 31
मरीन ड्राईव्हवर साजरा करताय न्यू ईअर? जाणून घ्या नियमावली..
आज 2020 चा शेवटचा दिवस आहे. कोरोना महामारीनं संकटात गेलेल्या या वर्षाच्या समाप्तीचा जल्लोष करण्यासाठी नागरिक रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतील. अशी गर्दी टाळण्याचे आवाहन मुंबई महापालिका, पोलीस व राज्य प्रशासनाने करत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसारच मुंबईत यंदाचं न्यू-ईअर सेलिब्रेशन असणार आहे. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरला मुंबई शहरात मोठी गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतो. मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती असताना मुंबईत कशी आहे नववर्षाची आणि 31 डिसेंबरच्या जल्लोषाची परिस्थिती, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
14:56 December 31
नववर्षाचे स्वागत घरातूनच करा; औरंगाबाद प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
औरंगाबाद -नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुणाईही सज्ज झाली आहे मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता काही नियम आणि अटी या घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री अकरानंतर कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असलं किंवा जल्लोष करताना आढळून आलं तर पोलिस कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
14:05 December 31
नव वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात ४ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर - नववर्षाच्या स्वागताला आता काहीच तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी कुठली अप्रिय घटना घडू नये, याकरिता तब्बल चार हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त शहरात तैनात केला आहे. याशिवाय वाहतूक विभागाचे सातशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील रात्रभर बंदोबस्तात तैनात असतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील उड्डाणपूल देखील वाहतुकीकरिता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
12:56 December 31
मद्यपी ओळखण्यासाठी ब्रेथ एनलायजर टेस्टला फाटा; ब्लड टेस्ट होणार
31 डिसेंबरला ड्रिंक ड्राइव्ह करणाऱ्या नागरिकांना पकडण्यासाठी वापरात येणारे ब्रेथ एनलायजर मशीन वापरात येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ब्रेथ एनलायजर टेस्ट ऐवजी नागरिकांनी अल्कहोल प्राशन केले आहे का नाही ते पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
12:55 December 31
घरातूनच नव वर्षाचे स्वागत करा; पुण्यात ५ हजार पोलीस तैनात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे स्वागत यंदा घरातूनच करावे लागणार आहे. प्रतिवर्षी शहरात मोठ्या जल्लोषात नव वर्षाचे स्वागत करतात. मात्र, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप कमी न झाल्याने महानगरामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच आज रात्री ११ वाजेपर्यंतच शहरातील हॉटेल, मॉल, पब, रेस्टारंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुणे शहरात संचार बंदी असल्याने बंदोबस्तासाठी तब्बल ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घरातूनच नव वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
12:39 December 31
'हेल्पिंग हॅण्ड'..! नवीन वर्षाच्या पार्टीसाठी जमा केलेले पैसे बेघरांच्या मदतीला
कोरोनाचे सावट यावेळी प्रत्येक सणावरती आहे. यामुळे नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने साजरी करण्याचे युवकांनी ठरवले आहे. मुंबईतील काही मित्रांनी एकत्र येत नवीन वर्षाच्या पार्टीसाठी जमा केलेले पैसे हे गरजूंच्या मदतीला दिले आहेत. 'हेल्पिंग हॅण्ड' या बॅनरखाली 30 पेक्षा जास्त युवक एकत्र त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी विविध वस्तूंचे वाटप केले आहे.
12:37 December 31
गोव्यात पर्यटकांना मुभा; नव वर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारी पर्यटकांची मांदियाळी
कोरोना संसर्गाचे सावट थोडे दूर झाल्यानंतर गोवा सरकारने पर्यटनासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नववर्ष स्वागतासाठी गोव्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. सर्व समुद्र किनारे देशी पर्यटकांनी फुलले आहेत. तर विदेशी पर्यटकांची उणीव स्पष्ट दिसत आहे.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत यासाठी देशविदेशातील पर्यटक गोव्याला पसंती देत ख्रिसमसपासून गोव्यात दाखल होत येथील निसर्ग आणि आदरातिथ्य यांचा आनंद घेत असतात. यावर्षी मात्र, कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे यावर बंधने आली आहेत. तरीही सरकारने मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे मागील महिन्यांपासून काही हॉटेलमध्ये आगाऊ नोंदणी सुरू झाली होती. मात्र, हे सर्व पर्यटक देशाच्या विविध भागातील आहे.
10:34 December 31
पिंपरीत 31 डिसेंबरला नाईट कर्फ्यू; दोन हजार पोलिसांची राहणार गस्त
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात नूतन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची पाच पथक करडी नजर ठेवणार आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र,महानगर पालिकांच्या क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्युमुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. तर, काही नागरिकांनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
10:23 December 31
नाशकातही नाईट कर्फ्यू.. नव वर्षाचे स्वागत घरातूनच करा
नाशिक-यंदा नागरिकांना नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जपूनच करावी लागणार आहे. नाशिक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारी पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
10:14 December 31
साधेपणानेच नव वर्षाचे करा स्वागत; परभणीकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
परभणी- कोरोनाच्या अनुषंगाने आज (शुक्रवारी) जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे उद्या (गुरुवारी) दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व शुक्रवारी (एक जानेवारी 2021) नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, गुरुवारी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग राहील, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
10:11 December 31
कोरोना अद्याप संपला नाही; घरातूनच सेलिब्रेशन करा- यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ
यवतमाळ - २०२० हे वर्ष कोरोना महामारीने ग्रासलेले वर्ष म्हणून कायम स्मरणात राहणार आहे. यानंतर येणारे २०२१ हे कोरोनामुक्त वर्ष असावे यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत घरातूनच नव वर्षाचे स्वागत करावे. यंदा ३१ डिसेंबरला सेलीब्रेशन टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी केले.
10:09 December 31
नव वर्षाचे स्वागत घरातूनच करा; रस्त्यावरील मद्यपीवर कारवाई होणार
जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 'थर्टी फर्स्ट'साठी शासनाने अटी घालून दिल्या आहेत. या अटींचे पालन करुनच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्यासाठी जळगाव जिल्ह्यात थर्टीफर्स्टच्या रात्री ५७८ पोलीस रस्त्यावर असणार आहेत. सर्व हॉटेल्स, बियरबार यांना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातच रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असल्याची माहितीही पोलीस दलाने दिली आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी घरातूनच नव वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
10:02 December 31
नव वर्षाच्या स्वागतावेळी जालना पोलिसांची मद्यपीवर राहणार नजर
जालना- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जालनेकरांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोना काळात गर्दी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही योग्य त्या उपायोजना करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्याप्रमाणात बाहेर पडतात. मात्र, मद्य पिऊन कोणी वाहन चालवू नये यासाठी महामार्ग पोलसिांनी नाके बंदी केली आहे. 33 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 321 किलोमीटरच्या महामार्गावर नजर ठेवली जाणार आहे.
10:00 December 31
वेल कम टू शिर्डी.. पोलिसांकडून स्वागत करत भाविक पर्यटकांच्या नोंदी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांचं शिर्डी पोलिसांकडून अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीन स्वागत केल जातय. कोपरगाव आणि राहत्याच्या दिशेनं साईनगरीत येणा-या प्रत्येक वाहनाला चेकपोस्ट वर थांबवून त्यांची माहिती घेत नोंद ठेवली जात आहे. वाहनावर शिर्डीत स्वागत, वेलकम टू शिर्डी असा आशय असलेले स्टिकर पोलिसांकडून चिकटवले जात आहे. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळं शिर्डीत येणा-या भाविकांची संख्या, जिल्हा, राज्य याची माहीती मिळणार असून या नाकेबंदी मुळं नविन वर्षा दरम्यान साईनगरीत येणाऱ्या अपप्रवृत्तींना देखील चाप बसणार असल्याचं पोलीस उपविभागीय आधिकारी संजय सातव यांनी सांगीतलय.
09:26 December 31
नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांचा ओघ सुरू
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे गोव्याचा समुद्र किनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. सर्वांनी मास्क लावावा, सोशल डिस्टेन्सिंग चे पालन करावे, असे आवाहन गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी केले आहे.
09:24 December 31
नागरिकांनी दारू पिऊन वाहन चालवून पळ काढता येईल असे समजू नये. अल्कोहोल तपासणीसाठी रक्ताचे नमुने परीक्षणासाठी घेतले जाणार आहेत. 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रेस्टारंट, पब, बार, समुद्र किनारी, ईमारतींच्या छतावरती आणि बोटींवर पार्टी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलीस ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
09:16 December 31
मुंबईत ३१ डिसेंबरला नाईट कर्फ्यू
मुंबईत ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजल्यापासून १ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रेस्टॉरंट, पब, बार, समुद्र किनारी, ईमारतींच्या छतावरती आणि बोटींवर पार्टी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलीस ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
08:09 December 31
नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज
मुंबई -आज २०२० या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरातील नागरिक सज्ज झाले आहेत. कोरोना महामारीने ग्रासलेल्या या वर्षात 'जग'जीवन विस्कळीत झाले होते. संपूर्ण वर्षभर लॉकडाऊन आणि मृत्यूच्या सावटाखाली हे वर्ष घालवल्यानंतर आज २०२१ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जनता सज्ज झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण पर्यटन स्थळावर जाण्यास ईच्छूक असतात. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी अशा ठिकाणी बंदी गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला असला तरी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपपल्या परीने तयारी केल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने घेतलेला काही घडामोडींचा आढावा..