मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांना येत्या १६ मार्चपासून लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
लसीकरण मोहीम
मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून मुंबईमध्ये लसीकरण मोहीम सुरु झाली. या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, वयोवृद्ध, १८ वर्षावरील नागरिकांना व नंतर १५ ते १७ वयोगटातीला मुलांना लस दिली जात आहे. आतापर्यंत मुंबईमधील ११८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९९ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्या असताना त्यांना लस कधी देणार असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला आहे. याच दरम्यान आज केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना लस देण्याचे घोषित केले आहे.