महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिव्यांगांनी बनवलेल्या 25 हजार छत्री विक्रीसाठी तयार, खरेदी करण्याचे आवाहन - special story

नॅशनल असोसिएशन ऑफ डिसएबल एंटरप्राइजेस गेल्या 35 वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करत आहे. त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. गेल्या सात वर्षांपासून छत्री निर्मितीचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

विशेष स्टोरी
विशेष स्टोरी

By

Published : May 24, 2021, 7:31 PM IST

मुंबई -दी नॅशनल असोसिएशन ऑफ डिसएबल एंटरप्राइजेस (नाडे) या संस्थेतर्फे सध्या मोठ्या प्रमाणत विक्रोळीच्या वर्क शॉपमध्ये छत्र्यांची निर्मिती सुरू आहे. ही निर्मितीही खास आहे. कारण सुमारे दीडशे अंध, अपंग, मूकबधिर या छत्र्यांची निर्मिती करीत आहेत. या विक्रीतून दिव्यांगांना कोरोना काळातही रोजगार मिळत आहे. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त छत्र्या बनवून तयार आहेत. या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..

नॅशनल असोसिएशन ऑफ डीसेबल एंटरप्राइजेस गेल्या 35 वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करत आहे. त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. गेल्या सात वर्षांपासून छत्री निर्मितीचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र मागील वर्षी कोरोनामूळे त्यांच्या छत्रीला मागणी मिळत नव्हती, यामुळे छत्र्यांची विक्री घटली होती. यंदा पुन्हा संस्थेने काम सुरू केले आहे आणि यावेळी मागणी वाढेल, अशी आशा संस्थेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून काम सुरू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

विक्रीसाठी समाज माध्यमांची मदत
समाज माध्यमांचा वापर करून आता संस्थेने छत्री विक्री सुरू केली आहे. दरवर्षी या छत्र्यांच्या विक्री करण्यासाठी संस्थेतर्फे कंपनी किंवा काही ठिकाणी स्टॉल लावण्यात येतात. यंदा बंदी असल्यामुळे ऑनलाइन विक्रीवर संस्थेने भर दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही सेवा उपलब्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

'स्वतःची हक्काची जागा नाही'
गेल्या 35 वर्षांपासून ही संस्था दिव्यांग व्यक्तींसाठी काम करत आहे. या संस्थेत सध्या दीडशे दिव्यांगांना रोजगार मिळत आहे. आमच्याकडे संस्थेची स्वतःची हक्काची जागा नाही. राज्य सरकारने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही भविष्यात 10 हजार दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती करू शकतो, असे दी नॅशनल असोसिएशन ऑफ डिसएबल एंटरप्राइजेस संस्थेचे पदाधिकारी विक्रम मोरे यांनी सांगितले.

'रोजगार मिळाल्याचा आनंद'
लॉकडाऊन असल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आली. घरातून बाहेर निघू शकत नाही, हाताला काम नाही, काय करायचे अशी वेळ आमच्यावर आली होती. आता काही दिवसांपूर्वी संस्थेचा फोन आला आणि छत्री बनवण्याचे काम असल्याचे सांगण्यात आले. यामुळे रोजगार उपलब्ध झाला असून खूप आनंद होत असल्याचे या संस्थेत काम करणाऱ्या ज्योती बोराडे यांनी सांगितले.

हेही वाचा -रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी डॉक्टर गाणे गातात तेव्हा...

ABOUT THE AUTHOR

...view details