मुंबई- जगभरात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्राॅनचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतही परदेशातून आलेले ओमायक्राॅनचे दोन रुग्ण आढळले आहेत. ओमायक्राॅनच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने सेव्हन हिल रुग्णालयातील एक मजला राखीव ठेवला असून त्यातील 250 बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत.
250 बेड्स सज्ज -
कोरोना विषाणूचा ओमायक्राॅन हा नवा व्हेरियंट ( Omicron Variant) समोर आला आहे. ओमायक्राॅनला मुंबई विमानतळावरच रोखण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत किंवा ज्यांना ओमायक्राॅनची लागण झाली आहे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालय सज्ज ठेवले आहे. या रुग्णालयातील एक मजला व त्यामधील 250 बेड्स कोरोना पॉझिटिव्ह तसेच ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या शिवाय ताडदेव येथील ब्रीच कॅडी आणि बाॅम्बे रुग्णालयात प्रत्येकी दहा बेड्स तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.