मुंबई - मुंबई महानगरपालिकेद्वारे बोरिवली येथील जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम ५ आणि ६ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बोरिवली आणि दहिसर या विभागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा राहणार बंद :महापालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील आर/मध्य विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम गुरुवार ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपासून शुक्रवार ६ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कालावधीत आर/ मध्य बोरिवली व आर /उत्तर दहिसर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्यांचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.