मुंबई - मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब आयुष्यभर लढत राहिले. मराठी माणसांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी ते चर्चेत राहिले. मात्र त्यांनी कधीही कोणाचीही पर्वा न करता आपली मतं प्रत्येक मुद्द्यावर नेहमीच परखडपणे मांडली. बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कसलीही पर्वा न करता आपली परखड मतं मांडली. महाराष्ट्रातच मराठी माणसाची होणारी गळचेपी, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद असोत, बाबरी मशिदीचा मुद्दा असोत, किंवा थेट पाकिस्तान बाबतची भूमिका असोत, बाळासाहेबांची तोफ धडाडणार राहिली. त्यामुळे ते नेहमीच मराठी माणसा सहित तमाम देशातील नागरिकांच्या गळ्यातलं ताईत राहिले. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वादळ उभी केली. आज त्याच बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेऊ.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसेच एक पत्रकार देखील होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या आईचे नाव रमाबाई. एकूण नऊ भावंडांपैकी बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रस्थानी होते. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळाल. पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जनरल या इंग्रजी वृत्तपत्रातून केली. या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली. यासोबतच टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्र मध्ये देखील त्यांनी काढलेले व्यंगचित्र प्रसिद्ध होत होते. 13 जून 1948 ला बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न मीनाताई ठाकरे यांच्याशी झाले. नोकरीमध्ये त्यांना रस वाटत नव्हता म्हणून 1960 साली त्यांनी आपलं स्वतःचं मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. मार्मिक च्या माध्यमातून महाराष्ट्रातले आणि मराठी माणसाचे प्रश्न त्यांनी समोर आणण्याची सुरुवात केली. महाराष्ट्रात त्यावेळी वाढणारी गैर मराठी लोकांची लुडबुड यावर भाष्य करणारी व्यंगचित्र त्यांनी मार्मिक मधून प्रसिद्ध केली.
शिवसेनेचा जन्म