मुंबई- मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारती पडून जीवित व वित्त हानी होते. जीवित हानी रोखण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदाही अशी यादी जाहीर करण्यात आली असून मुंबईत ४६५ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी १३४ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. सध्या २२४ इमारती धोकादायक म्हणून आजही उभ्या आहेत. या २२४ इमारतींमध्ये ( 224 Dangerous Buildings in Mumbai ) आजही हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रहात आहेत.
२२४ अतिधोकादायक इमारती
पावसाळ्यात इमारती कोसळून जीवित हानी रोखण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुंबईत ४६५ इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी १३४ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ७६ इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. १०७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून २२४ अतिधोकादायक इमारतींत रहिवासी वास्तव्य करत आहेत. तर ३१ धोकादायक इमारतींचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यामधील नागरिकांना इमारतींमधून बाहेर काढणे शक्य नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले.
तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश
पावसाळ्यात इमारती कोसळून होणा-या दूर्घटनांमध्ये जिवीतहानी होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त इकाबल सिंह चहल ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागातील धोकादायक इमारती, महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आपत्कालीन व्यवस्थापन कायदा-२००५ नियमांनुसार अतिक्रमणांच्या आस्थापनांवर यथोचित कार्यवाही तातडीने करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईतील धोकादायक इमारती
- ४६५ - इमारती धोकादायक
- १३४ - इमारती जमीनदोस्त
- १०७ - इमारती रिकाम्या केल्या
- ७६ - इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन कापले
- ३१ - प्रकरण न्यायप्रविष्ट
- २२४ - इमारतीत रहिवाशांचे वास्तव्य
हेही वाचा : BMC Pilot Project : मुंबईत कचऱ्यापासून खत निर्मिती, पालिका शेतकऱ्यांना देणार मोफत कंपोस्ट खत