मुंबई -राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे 213 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 8 जण अद्यापही बेपत्ता असून 52 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 398 जनावरांचा मृत्यू तर 60882 कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने घातलेले थैमान यामुळे अनेकांचे जीव गेले. खास करून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 95 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. तर यासोबतच चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागणार आहे. काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचे जीव गेले. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत 213 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेले आहेत. तर तिथेच अद्यापही 8 जण बेपत्ता आहेत. रायगडच्या तळई गावात गावकऱ्यांच्या विनंतीनंतर शोधकार्य थांबण्यात आले आहे.
जिल्हा निहाय आकडेवारी
- रायगड- 95 मृत्यू, 26 जण जखमी, तर 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
- रत्नागिरी - 35 जणांचा मृत्यू, 1 जण बेपत्ता, 10 जण जखमी तर 115 जनावरांचा मृत्यू
- कोल्हापूर - 7 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता तर 110 जनावरांचा मृत्यू
- सातारा - 46 जणांचा मृत्यू, तर 3 जण बेपत्ता आहेत. मात्र साताऱ्यामध्ये 41 जनावरांचा मृत्यू
- सिंधुदुर्ग- 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता तर 1 व्यक्ती जखमी, 30 जनावरांचा मृत्यू
- मुंबई - 4 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी
- पुणे - 3 जणांचा मृत्यू तसेच 8 जनावरांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
- ठाणे - 15 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी, 1 जण बेपत्ता, तर 15 जनावरांचा मृत्यू
- वर्धा 2 जणांचा मृत्यू
- अकोला - 2 जणांचा मृत्यू