महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2016 पासून पत्राचाळीतील 302 विजेते घरांच्या प्रतीक्षेत, आणखी बराच काळ करावी पाहावी लागणार वाट? - म्हाडा २०१६ लॉटरी प्रकरण

2016 मध्ये मुंबईतील घरांच्या लॉटरीचा आकडा फुगवण्यासाठी तत्कालीन उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी पत्राचाळीतील 302 घरांचा समावेश लॉटरीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सगळ्या बाबीकडे कानाडोळा करत उपाध्यक्षांनी पत्राचाळ पुनर्विकासातील म्हाडाच्या हिश्श्यातील अर्धवट बांधकाम असलेली 302 घरे लॉटरीत घेतली. जोपर्यंत पत्राचाळ पुनर्विकास मार्गी लागत नाही तोपर्यंत या विजेत्यांना घराची वाट पाहावी लागणार आहे.

2016 mhada lottery winners are still waiting for houses  due to Corruption
म्हाडा

By

Published : Mar 16, 2021, 3:17 PM IST

मुंबई - गोरेगावसारख्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात म्हाडाचे घर मिळत असल्याने 2016 च्या लॉटरीत मोठ्या संख्येने पत्राचाळीतील 302 घरांसाठी अर्ज केले. त्यानुसार 302 अर्जदार विजेते ठरले. म्हाडाचे घर लागल्याने हे विजेते आनंदात होते. पण हा आनंद क्षणिक ठरला असून आता या विजेत्याना मोठा मनस्ताप भोगावा लागत आहे. कारण आज पाच वर्षे झाली तरी घराची प्रतिक्षा करावी लागत आहे. जोपर्यंत पत्राचाळ पुनर्विकास मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे 302 विजेतेही म्हाडावर नाराज आहेत.

विरोध असतानाही म्हाडाने 'ही' घरे घेतली लॉटरीत -
2016 मध्ये मुंबईतील घरांच्या लॉटरीचा आकडा फुगवण्यासाठी तत्कालीन उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी पत्राचाळीतील 302 घरांचा समावेश लॉटरीत करण्याचा निर्णय घेतला. पत्राचाळीचा मोठा घोटाळा उघड झाला असताना, हा प्रकल्प रखडलेला असताना, हा प्रकल्प कधी मार्गी लागणार याचे कोणतेही उत्तर नसताना आणि प्रकरण न्यायालयात गेलेले असताना या प्रकल्पातील घरे लॉटरीत घेऊ नये, अशी भूमिका म्हाडा अधिकारी, अभियंत्यांनी घेतली होती. याला म्हाडातूनच विरोध झाला होता तर प्रसार माध्यमातून ही म्हाडाच्या या निर्णयावर टीका झाली होती. मात्र या सगळ्या बाबीकडे कानाडोळा करत उपाध्यक्षांनी पत्राचाळ पुनर्विकासातील म्हाडाच्या हिश्श्यातील अर्धवट बांधकाम असलेली 302 घरे लॉटरीत घेतली. त्यासाठी लॉटरी काढलीही. दरम्यान या घरांचे काम लवकर पूर्ण करत विजेत्यांना ताबा दिला जाईल असा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता. पण हा दावा साफ खोटा ठरला आहे.

आम्ही पुरते फसलो!
म्हाडाची लॉटरी असल्याने अर्जदार मोठ्या विश्वासाने अर्ज करतात. त्याप्रमाणे मी ही अर्ज केला. गोरेगावसारख्या ठिकाणी 30 लाखांत घर मिळाले याचा मोठा आंनद तेव्हा झाला. पण एक वर्षानंतर कळले की आपल्याला घराचा ताबा काही लवकर मिळणार नाही. हा प्रकल्प रखडला असून यात मोठा घोटाळा झाला आहे, हे ही समजले. तेव्हा वाटले आपण तर फसलो. कारण घराचा ताबा मिळण्यासाठी किती वर्षे वाट पाहावी लागणार याचे उत्तर म्हाडाकडे नाही की सरकारकडे नाही. त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागणार आहेच. पण दुसरीकडे आम्ही घर घेऊ शकत नाही की म्हाडाच्या इतर लॉटरीत ही अर्ज करू शकत नाही. एकूणच आम्ही 302 जण अडकून राहिलो असल्याची प्रतिक्रिया पत्राचाळीतील घरासाठीचे विजेते त्रिलोचन सिंग यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. तर सरकार आणि म्हाडाच्या उदासीन धोरणावर नाराजी ही व्यक्त केली आहे.

पाठपुरावा करून थकलो..
2017 मध्ये आम्हाला कळले ही घरे घोटाळ्यात अडकलेल्या आणि रखडलेल्या प्रकल्पातील आहेत. त्यामुळे पुढे आम्ही सर्व विजेत्यांनी एकत्र येत घरे लवकरात लवकर मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला असेही सिंग सांगतात. म्हाडाच्या अधिकाऱ्यापासून गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत सगळयाची भेट घेतली. पण कुणीही ठोस काही सांगताना दिसत नाहीत असे म्हणत सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतला असून आता म्हाडा हा प्रकल्प मार्गी लावणार आहे. पण म्हाडाकडून ही या कामाला विलंब होत आहे. प्रकल्प ताब्यात घेऊन तीन वर्षे होऊन गेली तरी अजून कामाला सुरुवात नाही. त्यात जॉनी जोसेफ समितीचा अहवाल सादर झाला खरा, पण त्यावर अजूनही निर्णय घेतला जात नाहीये. तर महत्वाचे म्हणजे प्रकल्प मार्गी लागल्यानंतरही काम पूर्ण करत ओसी मिळवत प्रत्यक्ष विजेत्यांना घराचा ताबा देण्यासाठी ही बराच काळ लागणार आहे. त्यामुळे 302 विजेत्यांची प्रतीक्षा मोठी असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details