मुंबई -वर्षभरापासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. हा प्रसार रोखताना आणि मुंबईकरांवर उपचार करताना, सोयी सुविधा देताना महापालिकेच्या ६२५१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २०१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ४६ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यांपासून आजतागायत ५ लाखांहून अधिक मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ हजारांहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सोयी सुविधा देताना व त्यांच्यावर उपचार करताना तब्बल ६,२५१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५, ३४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २०१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४६ मृत्यू हे घनकचरा विभागातील आहेत. त्याखालोखाल आरोग्य विभागातील ३८ कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-रेमडेसिविर पुरवठ्याबाबत आता नियंत्रण कक्षाकडे कंट्रोल; रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा तर स्टॉकीस्टवरही लक्ष
४६ जणांना अनुकंपा नोकरी -
कोरोना दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले होते. त्यानुसार पालिकेने पाठवलेल्या १६९ प्रस्तावांपैकी ९३ प्रस्ताव निकषात बसत नसल्याचे कारण देत केंद्र सरकारने आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५० लाख रुपये पालिकेने दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या लढ्यात मृत झालेल्या कुटुंबांतील ४६ जणांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे. मृत कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा-महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र
राज्यात ५८ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णाची नोंद
राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ५८ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत ३९ हजार ६२४रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.