मुंबई : वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्यात रणकंदन सुरू असताना विद्युत नियामक आयोगाने राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात 1 एप्रिलपासून वीज दरात 2 टक्क्यांनी कपात करण्याचा महत्वाचा निर्णय विद्युत नियामक आयोगाने घेतला आहे. सामान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा
एमईआरसी अर्थात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज दरात दोन टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र याचा बोजा ग्राहकांवर पडू नये म्हणून एसएसी फंड(इंधन संयोजन कर) वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. त्यामुळे सामान्यांसह व्यापारी आणि उद्योजकांनाही याचा लाभ होणार आहे. वीज दरातील कपातीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना काळातील वाढीव बिलांवरही होणार निर्णय!
कोरोना काळात आलेले जास्तीचे वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात थकीत वीज बिलांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्यानंतर यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. तसंच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाने एकत्र बसून वीज बिलासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे याची चर्चा येत्या दोन दिवसांत केली जाईल असंही ते म्हणाले होते.
हेही वाचा -'वीज ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर महावितरण जगणार कसे'