मुंबई- एसटीच्या लालपरीने गेल्या 10 दिवसात राज्याच्या विविध भागातील तब्बल 2 लाख 1 हजार 988 श्रमिक, मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचवले आहे. त्यासाठी एसटीच्या हजारो बहाद्दर चालकांनी अहोरात्र मेहनत करून तब्बल 15367 बसेसद्वारे मोलाची कामगिरी बजावली आहे.
लालपरीची कमाल.... 2 लाख श्रमिकांना दिला 'आधार' - 2 लाख कामगार एसटी बस प्रवास
एसटीच्या लालपरीने गेल्या 10 दिवसात राज्याच्या विविध भागातील तब्बल 2 लाख 1 हजार 988 श्रमिक, मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे.
या बहाद्दर चालकांना एसटीच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबर राज्य परिवहन विभागाचे देखील बहुमोल सहकार्य लाभले आहे. गेली 72 वर्ष राज्याच्या सर्वसामान्य जनतेला सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा देणाऱ्या एसटीने वेळोवेळी आपले सामाजिक भान जपत , संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आज कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार 23 मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्याना दळणवळणाची सेवा एसटीमार्फत पुरवण्यात येत आहेत. त्याचबरोबर 9 मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हातान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी धावत आहेत.