मुंबई- अरबी समुद्रात अडकलेल्या P-305 या बाजूवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू आहे. यासाठी आयएनएस-कोची या युद्ध नौकेच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 185 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी 124 जणांना मुंबईत सुरक्षित आणण्यात आलेले आहे. आयएनएस कोचीचे सीईओ सचिन सिक्वेरा यांनी याबाबतची माहिती दिली. आएनएस कोची आज सकाळी मुंबई हार्बर बंदरात दाखल झाले.
शोध कार्यादरम्यान 34 जणांचे मृतदेह सापडले-
तौक्ते चक्री वादळात अडकलेल्या अरबी समुद्रातील P 305 या बार्ज वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची व आयएनएस कोलकाता या दोन युद्ध वाहू नौकांनी मदत कार्य सुरू केले होते . त्यांनी आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 34 जणांचा मृत्यू झालेला असल्याचं नौदलाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. यातील 16 मृतदेह आयएनएस कोची मधून आणण्यात आलेले असून कोलकाता मधून इतर कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन येण्यात येत आहे. या बचाव कार्य दरम्यान 185 जणांना आयएनएस कोची द्वारे रेस्क्यू करण्यात आलेले असून मृतांचा अधिकृत आकडा अद्याप नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आलेला नाहीये. नौदल आणि तटरक्षक दलाकडून अद्यापही शोध मोहीम राबविली जात आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या P-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरची सुद्धा या बचाव कार्यात मदत घेतली जात आहे. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून आतापर्यंत 185 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. यामध्ये आयएनएस कोची या युद्ध नौकेच्या सहाय्याने या नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे.
आयएनएस कोचीकडून 184 जणांना वाचवण्यात यश तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अरबी समुद्रातील काही जहाजांवर नागरिक अडकून पडल होते. त्यांना वाचविण्यासाठी नौदल आणि सागरी किनारपट्टी सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवार पासून बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर जीएल वरील सर्व १३७ जणांना सुखरुपणे वाचविण्यात आले. तसेच एसएस-३ वरून १९६ आणि सागर भूषण वरील १०१ कर्मचारी सुखरुप आहेत. जीएएल वरील सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करून मंगळवारी दुपारी आयएनएस शिक्रा वर सुखरूप उतरवण्यात आले. यावेळी सीकिंग हेलिकॉप्टर्सच्या दोन पथकांनी 35 जणांची सुटका करुन त्यांना सुखरूप परत आणले.
आयएनएस कोचीकडून 184 जणांना वाचवण्यात यश बचाव मोहिमेच्या आज तिसऱ्या दिवशी आयएनस कोचीने एकूण १८५ जणांची सुखरूप सुटका करून मुंबई हार्बर बदराकडे परत आले आहेत. तर आयएनएस तेग , आयएनएस बेटवा, यांच्याकडून अद्याप बचाव कार्य सुरुच ठेवण्यात आले आहे. आयएनस तलवारही सध्या त्या परिसरात आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव पाहता, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून समुद्र अजूनही खवळलेला असल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग हा 35 ते 55 किलोमीटर प्रतितास असल्यामुळे बचावकार्यात यामुळे अडथळा येत असल्याचे नौदलाचे म्हणणे आहे. अशा बिकट परिस्थितीत बचाव कार्य करत असताना नौदलाची जहाज व हेलिकॉप्टरना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.