मुंबई - राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच कारागृहातून जवळपास 17 हजार कैद्यांना तात्पुरते जामिनावर सोडण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. तसेच 'जेलमधील काही कैद्यांना सोडण्याचा आणि आठ जेलमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे' अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...'मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करावी'
मुंबईतील आर्थर रोड कारागृहात 185 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील 60 कारागृहात असणाऱ्या एकूण 35 हजार कैद्यांपैकी 17 हजार कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्यात येणार आहे. आर्थर रोड कारागृहासारखी परिस्थिती राज्यातील इतर कारागृहात निर्माण होऊ नये, यासाठी म्हणून तब्बल 8 कारागृहे संपुर्णतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात खटले सुरू असलेल्या 50 हजार कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्यात आले आहे. यानंतर 7 वर्षांची शिक्षा झालेले 3 हजार कैदी, 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेल्या 9 हजार कैद्यांचा आथा समावेश करण्यात येत आहे. मात्र, टाडा, बँकांचे आर्थिक गुन्हेगार, बलात्काराचे आरोपी, मकोका गुन्हेगार यांना सोडण्यात येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येत आहे, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.