मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार होत असताना मुंबईची लाईफलाईन असलेली ट्रेनची सेवा बंद करण्यात आली. अशावेळी मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाने गेले पाच महिने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहोचवले. या कालावधीत बेस्टचे १७८० कर्मचारी कोरोना बाधित झाले असून १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १६५८ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.
बेस्टच्या १६५८ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू - बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू
उपक्रमाच्या १७८० हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून १६५८ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. आजही ११८ कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना २२ मार्चला देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही बंद करण्यात आली. लोकल ट्रेन बंद केल्याने कोरोनावर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी, शहरात कायदा व सुव्यवस्था पाहणारे पोलीस, सफाई कर्मचारी, पाणी विभागातील कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे मोठे आव्हान होते.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांंना नियोजित स्थळी पोहचवण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमाकडे देण्यात आली. बेस्ट उपक्रमाकडून ही जबाबदारी गेले पाच महिने पार पाडली जात आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडली जात असताना बेस्ट उपक्रमाच्या १७८० हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून १६५८ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. आजही ११८ कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
बेस्ट उपक्रमाचे बहुतेक कर्मचारी कोरोनामधून बरे झाल्यावर त्यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण होताच पुन्हा कामावर हजर झाल्याने बेस्ट उपक्रमाकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्याला लागणाऱ्या सुविधा आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून पालिकेशी संपर्क साधला जातो. कर्मचाऱ्यांची योग्य अशी काळजी उपक्रमाकडून घेतली जात असल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.