मुंबई- मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याच्या आणि रस्त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी समोर येतात. यावर्षीही मुंबईत शुक्रवारपासून पाऊस सुरू झाल्यावर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत गेल्या चार दिवसात खड्डे पडल्याच्या 150 हुन अधिक तक्रारी नोंद झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई पालिकेकडे 150 हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी - मुंबई खड्डे बातमी
मुंबईत मागील चार दिवसात खड्डे पडल्याच्या 150 पेक्षा अधिक तक्रारी नोंद झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत मागील चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी आधीच खराब रस्ते त्यात संततधार पावसाची भर पडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या मुंबईत कोरोनाच्या विरोधातील लढ्यात जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी उतरले आहेत. या कामांत गुंतल्यामुळे खड्डे व त्याबाबतच्या केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, उशिरा का होईना काही ठिकाणी खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी मुंबईतील रस्ते बांधकामासाठी कंत्राटदारावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. कोरोनाचा संसर्ग मुंबईत रोज वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी गुंतलेले आहेत. त्यात कमी मनुष्यबळ असल्याने रस्त्यांच्या कामावर दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याने, पावसात अशा रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत.
रस्त्यावरील खड्डयांचे फोटो काढून काही जागरुक नागरिक ‘माय बीएमसी पॉटहोल फिक्सईट’ या ऍपवर अँड्राईड मोबाईलद्वारे अपलोड करत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत विविध प्राधिकरणाच्या हद्दीसह महापालिकेच्या हद्दीतील तसेच विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग आदींच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर डांबरी रस्त्यांवरील खड्डा 24 तासांमध्ये तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डा 48 तासांच्या आत भरणे बंधनकारक आहे..
हेही वाचा -दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता दोन तास वाढीव मुदत